मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे -ओंकार देशमुख
अनुचित प्रकार रोखण्यासाठी आमची टीम तत्पर – नीता अंधारे
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यासाठी ९४ हजार १४ मतदार संख्या असून या मतदारांनी निर्भयपणे शांतपणे शांततेत व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धाराशिव ओंकार देशमुख व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दि.७ नोव्हेंबर २०१५ रोजी केले.
धाराशिव नगर परिषद निवडणूक संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, धाराशिव नगर परिषदेत अंतर्गत ४१ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. २० प्रभागापैकी १९ प्रभागामध्ये त्री सदस्य निवडणूक होणार आहे. मतदान करण्यासाठी प्रभागांमध्ये १०० मतदान केंद्र तर प्रभागाबाहेर ८ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांसाठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया दि.१० ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दुपारी ३.३० वाजेपर्यंत रविवार सुट्टीचा दिवस वगळून सुरू राहणार आहे. तर छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून दि.२० ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. तर दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि.२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर दि.३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतदान मोजणी प्रक्रिया होऊन निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मतदान प्रक्रियेसाठी काही अडचण आल्यास आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा ते आपणाशी संपर्क साधून आपणास निवडणूक संदर्भात आवश्यक ती मदत करतील. तर यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा निवडणूक प्रचार व्यवस्थित आहे का नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे १५ उमेदवारांसाठी एक बॅलेट पेपर राहणार असून उमेदवारांची संख्या किती असेल ? या वरती बॅलेट पेपरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील संवेदनशील मतदान भूतांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दिली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे त्या संदर्भात कारवाई केली जाईल असे देशमुख व अंधारे यांनी सांगितले.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास निवडणुकीत १५ लाख रुपये तर नगरसेवकास ५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे. तसेच मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड, शासकीय नोकरदार असल्यास शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आदींसह आवश्यक पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे देशमुख व अंधारे यांनी सांगितले.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













