‘आम्हाला आदेश मिळाले नाहीत!’ – प्रशासनाची दिरंगाई कालिका आणि गौरी कला केंद्रांना वरदान ठरली
धाराशिव – (प्रतिनिधी)
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गौरी आणि कालिका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतरही ही दोन्ही केंद्रे सुरुच आहेत. आदेश जारी झाल्यानंतरही तो संबंधित केंद्र चालकांना मिळाला नाही, हा कायदेशीर मुद्दा पुढे करत केंद्र चालकांनी प्रशासनाला चकवले आहे. “आम्हाला आदेशच मिळाले नाहीत, मग रद्द कसा?” असा तांत्रिक आधार घेऊन त्यांनी कला केंद्र सुरु ठेवले आहेत.
१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी व केंद्र सील करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्यावर होती. मात्र दिवाळीचा काळ आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे काम यामध्ये प्रशासन व्यस्त असल्याने आदेश प्रत्यक्ष केंद्र चालकांना न मिळाल्याचा फायदा त्यांनी घेतला. “आम्हाला काही माहिती नाही, काही घडलंच नाही,” अशा भूमिकेतून केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत.
पिंजरा कला केंद्राप्रमाणेच गौरी आणि कालिका केंद्रांचाही पंचनामा करून सील करणे अपेक्षित होते. परंतु आदेशाच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पिंजरा प्रकरणातसुद्धा माध्यमांतून बातमी झाल्यानंतरच सील करण्याची कारवाई करण्यात आली होती.
डीजे, बंद खोलीतील नृत्य, तसेच अनेक नियमांचा भंग करणाऱ्या कला केंद्र चालकांनी यावेळी मात्र प्रशासनाच्या “कायदेशीर त्रुटींवर” बोट ठेवले आहे. ऐन दिवाळीतही या केंद्रांवर कार्यक्रम सुरु राहिल्याने नागरिकांत संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यात उशीर का झाला? जबाबदार कोण? आणि केंद्रे कधी सील होणार? — या प्रश्नांची चर्चा आता जिल्ह्यात सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई, पिंजरा, साई, गौरी आणि कालिका या पाच कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. यापैकी साई व पिंजरा कला केंद्रांना सील करण्यात आले आहे. तुळजाई कला केंद्राने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘आव्हान’ दिले असून हे प्रकरण आता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात जाणार आहे.
नर्तिका पूजा गायकवाड आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात तुरुंगात असून, या प्रकरणी पोलिस व महसूल विभागाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. या निर्णयावर इतर केंद्रांचे भवितव्य ठरणार असल्याचे मानले जात आहे.
अनेक कुटुंबे उद्ध्वस्त आणि तरुणाई आहरी गेल्याने पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हा “कला केंद्रमुक्त” करण्याचा संकल्प केला आहे. मात्र काही स्थानिक व गावपुढाऱ्यांचा या केंद्रांना आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असून हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. तिथे प्रशासनाकडून शपथपत्र दाखल केले जाणार आहे.
काही केंद्रांवरील महिला खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनैतिक धंद्यांशी संबंधित गुन्हे नोंद असल्याने, प्रशासनाने सर्व केंद्रांची सविस्तर नोंद तयार करण्यास सुरुवात केली आहे. कोर्ट आणि अपील अधिकाऱ्यांसमोर कायदेशीर बाबी मांडणे प्रशासनासाठी निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, केंद्र चालकांनी पुन्हा केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली वेगवान केल्या असून त्यांनी “नियमांवर बोट ठेवणे” सुरू केले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












