उपनगराध्यक्ष कोण? अमित शिंदे की विलास लोंढे — धाराशिव नगरपरिषदेत भाजपमध्येच आता रंगली रस्सीखेच!
मल्हार पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष..उबाठाचा सफाया, भाजपची सत्ता.उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले असून एकूण ४१ जागांपैकी तब्बल २२ जागांवर विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत सुरुवातीपासूनच आमदार राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी रणनीतीची सूत्रे हाती घेतली होती. सूक्ष्म नियोजन, युवक कार्यकर्त्यांना दिलेले बळ, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांची योग्य बांधणी या सर्व घटकांमुळे भाजपला मोठे यश मिळाले. सुरुवातीपासून ही लढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विरुद्ध भाजप अशी स्पष्ट होती. मात्र प्रत्यक्षात ही लढाई आमदार पुत्र मल्हार पाटील विरुद्ध खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील प्रतिष्ठेची ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आगामी २०१९ च्या आमदारकीच्या राजकारणाचीही ही एक मोर्चेबांधणी असल्याचे बोलले जात होते.
या निवडणुकीत उबाठा गटाचा पूर्णपणे पराभव झाला असून त्यांच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली असून आता निवडणूक संपल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती उपनगराध्यक्ष पदाची. भारतीय जनता पक्षाचे धाराशिव शहराध्यक्ष अमित शिंदे हे प्रभाग क्रमांक ७ मधून तब्बल ९८४ मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक २० मधून आमदार राणा पाटील व मल्हार पाटील समर्थक युवा नेते विलास लोंढे यांनी शहरातील सर्वाधिक १५९५ मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. याच प्रभागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांनाही सुमारे १००० पेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याने विलास लोंढे यांची ताकद आणखी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर विलास लोंढे हे उपनगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून दुसरीकडे शहराध्यक्ष अमित शिंदे यांचीही दावेदारी मजबूत आहे. त्यामुळे भाजपमध्येच उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.
आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते आमदार राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या निर्णयाकडे. उपनगराध्यक्ष पदाची माळ अमित शिंदे यांच्या गळ्यात पडणार की विलास लोंढे यांना संधी मिळणार, याकडे धाराशिवच्या राजकारणाचे लक्ष वेधले गेले आहे. निवडणूक संपली असली तरी सत्ता वाटपाची खरी लढाई मात्र आता रंगात आली असल्याचे बोलले जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












