धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होणार का? – नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी व प्रशासन विभागाचे ताशेरे!
धाराशिव दि.२९(प्रतिनिधी):धाराशिव शहरातील अनधिकृत पोस्टर, बॅनर व डिजिटल होर्डिंग्स या गंभीर प्रश्नाकडे आता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ स्वराज्य फाउंडेशन विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आदेश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात धाराशिव नगरपरिषदेत हे आदेश पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले असून धाराशिव शहरातील सुज्ञ नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने अखेर वरिष्ठ प्रशासनाने ताशेरे ओढत कठोर भूमिका घेतली आहे.
शहरातील अभिजीत कदम (युवासेना शहरप्रमुख), राणा बनसोडे (माजी नगरसेवक) आणि प्रवीण केसकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी व सह आयुक्त सामान्य नगर प्रशासन विभाग यांना दिलेल्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपरिषदेस विशेष निर्देश दिले गेले. मात्र स्वच्छता विभागातील काही कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक (अर्थपूर्ण लागेबंधे) अवैध होर्डिंग्सला पाठबळ देतात, महसूल बुडवतात आणि नागरिकांच्या तक्रारींना उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावर कारवाई करताना दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांना नोटीस देऊन “शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवून अनुपालन अहवाल सादर करावा, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मुख्याधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल” असा स्पष्ट इशारा देण्यात आला. या नोटिसीनंतर मुख्याधिकारी यांनी “धाराशिव शहर स्वच्छ व होर्डिंगमुक्त करण्यासाठी तातडीने पावले उचावीत तसेच नियमभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करावी अशी मागणीही निवेदनकर्त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार यावेळी नगर प्रशासनाची कृती ठोस राहणार का, की पुन्हा एकदा कर्मचारीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना केराची टोपी दाखवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र जिल्हाधिकारी, सहआयुक्त आणि नगरपरिषद प्रशासन एकत्रितपणे ठाम पावले उचलतील तर लवकरच धाराशिव शहर अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनरपासून मुक्त होईल, अशी आशा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












