धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे महिलांनी प्रथमच मोठ्या संख्येने एकत्र येऊन अवैध दारू अड्ड्यांविरोधात थेट मोर्चा काढत रौद्ररूप धारण केले. गावात अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या वेग वेगळ्या दारूच्या धंद्यामुळे असंख्य संसार उद्ध्वस्त झाले, काहींनी दारूच्या नादात जीव गमावले. त्यामुळे हतबल झालेल्या महिलांनी अखेर या अवैध धंद्याचा शेवट करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.
महिलांनी गावातील प्रमुख रस्त्यावरून घोषणाबाजी करीत दारूविरोधी मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी थेट अवैध दारूच्या अड्ड्यांवर धडक मारली. दारूची दुकानं, अवैध दारू साठा आणि पत्र्याची शेड्स उलथून टाकून महिलांनी सर्व अड्डे उध्वस्त केले. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना सोबत घेत गावातील सर्व दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यास भाग पाडले.
या आंदोलनावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र पोलिस मात्र कुठेही दिसले नाहीत. एका गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असताना स्थानिक पोलिस / बीट अंमलदार काय करत होते, असा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दारू अड्डे चालविणाऱ्यांशी मिलीभगत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांकडे करत आहेत. गावात प्रथमच महिलांनी दाखविलेल्या या जाज्वल्य भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून महिलांच्या एकजुटीमुळे गावात महिलांनी दारूबंदीचा ठोस निर्णय लागू करण्यास प्रशासनास भाग पाडले आहे.














