धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील सारोळा (बु.)येथील रहिवासी सिद्धार्थ रामचंद्र कठारे (वय 35) यांचा कंटेनरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयाच्या समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी सिद्धार्थ कठारे हे महामार्गावरून जात असताना, वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित कंटेनर ताब्यात घेऊन तो धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे सारोळा (बु.)परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










