डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम
धाराशिव | लोकमदत न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने एक स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. समाजातील निराधार घटकांप्रती संवेदनशीलता जपत संस्थेने वृद्धाश्रमातील माता-भगिनींसाठी जीवनोपयोगी साहित्याचे वाटप केले.
धाराशिव येथील एमआयडीसी परिसरातील डॉ. विकास गपाट यांच्या “मातोश्री” वृद्धाश्रमात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वृद्धाश्रमातील निराधार महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना मोठा आधार मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
या प्रसंगी सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय (खली भाऊ) थोरात उपस्थित होते. तसेच मातोश्री वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा पानसरे मॅडम, इतर मान्यवर व स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी संजय थोरात यांनी “आम्ही आलो, तुम्हीही या” हे ब्रीदवाक्य मांडत समाजातील इतर संस्था व नागरिकांनी देखील अशा ठिकाणी भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. निराधार व वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा हा प्रयत्न निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













