नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या पाठपुराव्याला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामागे नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे.
धाराशिव येथे पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असताना नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी नाट्यगृहाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. यावेळी आपल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळत शासनाने १३ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय काढत निधी मंजूर केला आहे.
नगराध्यक्ष काकडे यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या निवेदनात नाट्यगृह हे शहरातील सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असल्याचे नमूद केले होते. विविध नाट्यप्रयोग, सांस्कृतिक उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रम येथे नियमित होतात. मात्र, आवश्यक सुविधा व दुरुस्तीसाठी निधीअभावी अडचणी निर्माण होत असल्याने तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.
शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या निधीतून नाट्यगृहाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. प्रकल्प खर्चात ९० टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर १० टक्के हिस्सा नगरपरिषदेचा राहणार आहे. तसेच सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निधीमुळे नाट्यगृह आधुनिक सुविधांनी सुसज्ज होणार असून धाराशिवच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या पुढाकारामुळे शहराच्या विकासाला गती मिळत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786
















