लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार प्रकरणात आरोपीस सत्र न्यायालयाचा जामीन
धाराशिव: लोकमदत न्यूज
लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी तरुणास धाराशिव येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पीडित महिलेचे नाव व गावाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी तरुणाने एका ३१ वर्षीय महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. या खोट्या आश्वासनाचा फायदा घेत त्याने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर व आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
पीडित महिलेनं २६ फेब्रुवारी २०२६ रोजी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४(२) व ६९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणात आरोपीच्या वतीने धाराशिव सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या वतीने अॅड. महेश कोकाटे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी तरुणास जामीन मंजूर केला. या प्रकरणात अॅड. कोकाटे यांना अॅड. दर्शन कोळगे व अॅड. प्रविण पाटील यांनी सहकार्य केले.












